उजेडाचे डोळे ओले



जगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात,निसर्गतःच किंवा संस्काराने नम्र असतात. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक व्यक्ती म्हणजे “उमेश जाधव“.  दोस्त म्हणतो च्या निमित्ताने भेट झालेल्या उमेश बंधूंचा पहिला काव्यसंग्रह “उजेडाचे डोळे ओले” च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज जाणं झालं.  पोवाडा, लावणी,मुक्तछंद, भारूड सारखे दुर्मिळ प्रकार जे आजच्या आमच्या पिढीला क्वचितच माहित असतील अश्या विविध काव्यप्रकारातील तब्बल ४३ कवितांचा अनमोल खजिना उमेश दादांनी या पुस्तकात मांडलाय.  उमेश दादांच्या कवितांची समीक्षा वगैरे करण्याचं धाडस मी करूच शकत नाही तितकी पात्रता माझ्यात नाही.  एक व्यक्ती म्हणून मला उमेश दादांच कौतुक करावंस वाटत.  कारण तुम्ही कवी, लेखक, कलाकार म्हणून कितीही चांगले असलात तरी “माणूस” म्हणून कसे आहात हे महत्वाच असतं.  उमेश दादा कवी म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच माणूस म्हणून नम्र आहेत.
दोस्त म्हणतो च्या त्रिकुटातील विजय बेंद्रे जर कवितेतून विद्रोह करत असेल आणि मेघांत प्रेम मांडत असेल तर उमेश दादा दुःख, व्यथा मांडतात किंबहुना तुम्हाला तुमच्या एखाद्या व्यथेशी, दुःखाशी समरस करून व्यक्त करायला भाग पाडतात. सूत्रसंचालक सौरभ नाईक यांनी आजच्या कार्यक्रमात उमेश दादांच्या माळीण दुर्घटनेबाबतच्या कवितेची एक आठवण सांगितली. माळीण दुर्घटनेबाबत उमेश दादांची एक कविता वर्तमानपत्रात छापून आली होती त्यावेळी पुण्याच्या एका व्यक्तीचा उमेश दादांना फोन आला.  त्या व्यक्तीच्या नात्यातील ८-१० माणसं या दुर्घटनेत जागीच गेली. कामाच्या निमित्ताने ती व्यक्ती पुण्याला आल्याने या अपघातातून वाचली.  या दुर्घटनेनंतर ह्या व्यक्तीच्या जणू संवेदना नष्ट झाल्या होत्या की काय म्हणून तो मोकळेपणाने रडू शकला नाही.  पण उमेश दादांची कविता वाचल्यावर तो मोकळेपणाने रडला. यावरून उमेश दादांच्या कवितेचा दर्जा लक्षात येतो. बरं इतकं दर्जेदार असूनही साधं भोळं राहणं कसं जमत कुणास ठावूक ?? Social दुनियेतल्या Like, Comment च्या बाजारापासून अगदी दूर कुठेतरी हा “उमेश वामन जाधव” नावाचा तारा चमकतोय.  तुम्हाला Whatsapp, Facebook वर सामाजिक विषयावरील एखादी अनामिक कविता जर आली तर ती कदाचित उमेश दादांची असू शकते आणि “कवितेखाली माझे नाव का नाही” याचा दोन ओळींचा साधा निषेधही दादा कधी व्यक्त करीत नाहीत.कार्यक्रमात त्यांच्या मित्रानी सांगितल्याप्रमाणे दादा मैत्रीखातीर अश्या कितीतरी रचना विनामूल्य स्वतःच नाव न लावता देतात आणि आम्ही आमचा फेसबुकचा चार ओळींचा स्टेटस चोरला तर दोन पानांचा निषेधाचा लेख लिहितो.  खरंच दादा जमलं तर तुमच्यातला नम्रपणा थोडासा… अगदी एक टक्का जरी आम्हाला दिलात तर खूप बरं होईल.
आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात चंद्रशेखर सानेकर, संदीप माळवी, प्रशांत मोरे, उंच माझा झोका या गीताचे गीतकार आणि जेष्ठ कवी  अरुण म्हात्रे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.  या मान्यवरांच्या सोबत उमेश दादांच्या आईवडिलांचा सत्कार होणं मला वाटतं उमेश दादांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असावा. दादांनी कवितासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतच लिहिलंय की, “ज्यांच्या उजेडाच्या कष्टात, मी माझ्या आयुष्याची कविता वाचतो आहे त्या माझ्या आईवडिलांना सविनय अर्पण”….खरंच त्या माता पित्याला अभिमान वाटावा असं लेकरू आहे त्यांचं…..
उमेश दादांच्या पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना अमोल शिंदे बोलले की मला आनंद यासाठी वाटतोय की आमच्या पिढीच एक पुस्तक आलंय… खरंच आमच्या पिढीचं कवितेचं एक पुस्तक आलय याचा आम्हाला अभिमान वाटतोय. प्रत्येकाने कवितेचे नेमके काय प्रकार असतात नुसतं हे जाणून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचलं तरी डोक्यात प्रकाश पडेल.
याअगोदर ज्या माळीण दुर्घटनेवरील कवितेचा उल्लेख केला त्या कवितेतील मला भावलेल्या ओळी…..
निष्पाप गेले जीव,
काय त्यांचा गुन्हा,
वाचलेला बाळ आता,
आई म्हणेल कुणा…..
काव्यसंग्रहाचे नाव :- उजेडाचे डोळे ओले
कवी :- उमेश वामन जाधव (8879803162)
प्रकाशक:- सई प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ :- विष्णू थोरे
पृष्ठसंख्या :- ६७
मूल्य :- रु.८०/-

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….